चीनमध्ये हजारो मशिदींवर बुलडोझर

0
612

बिजिंग, दि. २५ (पीसीबी) – चीनच्या शिनजियांग प्रांतामध्ये मुस्लिमांना अन्यायी वागणूक दिली जात आहे. त्यांचा आवाज दडपून टाकण्याची कारस्थाने रचली जात आहेत. शिनजियांगमध्ये मानवी हक्कांची पायामल्ली सुरु आहे. शिनजियांग प्रातांत आतापर्यंत हजारो मशिदी पाडण्यात आल्या आहेत. ऑस्ट्रेलियन थिंक टँकच्या एका अहवालातून ही माहिती समोर आली आहे. उइगर आणि बहुतांश मुस्लिम भाषिक लोकांना तुरुंगात डांबण्यात आले आहे. लोकांनी त्यांचे पारंपारिक, धार्मिक विधी बंद करावेत, यासाठी दबाव टाकला जात आहे.

ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटजिक पॉलिसी इन्स्टिट्यूटनुसार, जवळपास १६ हजार मशिदी पाडण्यात आल्या आहेत किंवा त्यांचे नुकसान झाले आहे. शेकडो धार्मिक स्थळांच्या उपग्रह फोटोंचे विश्लेषण करुन हा अहवाल तयार करण्यात आला आहे. मागच्या तीनवर्षात सर्वाधिक पाडकाम करण्यात आले. एका अंदाजानुसार, ८,५०० मशिदी पूर्णपणे पाडण्यात आल्या असे अहवालात म्हटले आहे. एएफपीने हे वृत्त दिलं आहे.

चिनी प्रशासनाने मशिदी पाडल्या असल्या तरी, शिनजियांगमधील अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांना मात्र हात लावलेला नाही, असे थिंकटॅकच्या पाहणीत समोर आले आहे. मुस्लीम समाजाचे वास्तव्य असणाऱ्या शिनजियांग प्रांतातील अतुश सुंथग या गावातील एक मशीद पाडून तेथे चक्क सार्वजनिक शौचालय उभारण्यात आलं आहे. तसेच इतर दोन ठिकाणीही मशिदी पाडण्यात आल्या आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार अतुश सुंथग या गावामध्ये दोन वर्षांपूर्वी एकूण तीन मशिदी होत्या. त्यापैकी तोकुल आणि अजना मशीद पाडण्यात आली आहे. तोकुल मशिदीच्या जागी सार्वजनिक शौचालय उभारण्यात आलं आहे. जिनपिंग सरकारने हाती घेतलेल्या सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत हे काम करण्यात येत असल्याचं रेडिओ फ्री एशियाने म्हटलं आहे.