Videsh

‘चीनमध्ये तपासणी करण्याऐवजी अमेरिकेतील लष्करी तळाची पाहणी करा’; जागतिक आरोग्य संघटनेला चीनचे आवाहन

By PCB Author

July 27, 2021

नवी दिल्ली, दि.२७ (पीसीबी) : जागतिक आरोग्य संघटनेने करोना विषाणूचे मूळ शोधण्यासाठी चीन आणि वुहानच्या प्रयोगशाळांमध्ये पुन्हा तपासणीचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावर चीनने आपली भूमिका स्पष्ट करत ही मागणी फेटाळून लावली होती. चीनमधील करोना व्हायरसच्या उत्पत्तीच्या दुसऱ्या फेरीच्या तपासणीची मागणी जसजशी तीव्र होत असतानाच, तशीच बीजिंगने अमेरिकेवर हल्ला चढवला आहे. चीनमध्ये तपासणी करण्याऐवजी अमेरिकेतील लष्करी तळाची पाहणी करण्याचे जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यूएचओ) आवाहन केले आहे.

चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान म्हणाले, “जर प्रयोगशाळांची चौकशी करायची असेल तर डब्ल्यूएचओ तज्ञांनी फोर्ट डेट्रिकला जायला हवे.” “अमेरिकेने शक्य तितक्या लवकर पारदर्शक आणि जबाबदारीने काम केले पाहिजे आणि आरोग्य संघटनेच्या तज्ञांना फोर्ट डेट्रिक लॅबच्या चौकशीसाठी बोलवले पाहिजे. या मार्गानेच जगासमोर सत्य बाहेर येऊ शकते,” असे झाओ लिजियान म्हणाले.

झाओ लिजियान यांचे हे विधान प्रयोगशाळेतून करोना व्हायरसची गळती होऊन एखाद्या व्यक्तीला त्याची लागण झाली आणि नंतर तो जगभर पसरला या सिद्धांताशी संबंधित होते. कोविड -१९ च्या पहिल्या घटना वुहानमध्ये नोंदल्या गेल्या असल्याने, चिनी शहरातील प्रयोगशाळेला मुख्य संशयित मानले जात आहे. तर, चीनने याचा कडाडून विरोध केल आहे आणि अनेक वेळा असा आरोप केला आहे की, चीनच्या प्रयोगशाळेतून विषाणू पसरल्याचा सिद्धांत मांडणाऱ्यांनी अमेरिकेतला फोर्ट डेट्रिक जैविक प्रयोगशाळेची चौकशी केली पाहिजे. वुहानमधील प्रयोगशाळा आणि बाजारपेठेची तपासणी करण्यासह चीनमध्ये कोविड-१९ च्या उत्पत्तीच्या पुढील टप्प्यासाठीच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रस्तावावर चीनने जोरदार प्रतिक्रिया दिली आहे.

ग्लोबल टाईम्सच्या अहवालानुसार अमेरिकन फोर्ट डेट्रिक बायोलॅबची तपासणी करण्यासाठी चिनी नेटिझन्सनी स्वाक्षर्‍यांची मोहिम सुरु केली होती. यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेने या प्रयोगशाळेची तपासणी करावी अशी मागणी करण्यात आली होती. या स्वाक्षर्‍याची संख्या १ कोटी ३० लाखांवर पोहोचली आहे. पण आतापर्यंत अमेरिकेने यावर प्रतिक्रिया दिली नाही. मात्र अमेरिकेतून या सिग्नेचरच्या सर्व्हरवर हल्ला करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

फोर्ट डेट्रिक येथील जैविक प्रयोगशाळेच्या संदर्भातील सर्व शंकांबाबत अमेरिकेने उत्तर दिले पाहिजे. १३ दशलक्षाहून अधिक चिनी नेटिझन्सनी न्यायाची मागणी केली असताना ते अजूनही शांत का आहे? आता दावा करणारी पारदर्शकता कुठे आहे?’’ असे ग्लोबल टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार झाओ लिजियांग यांनी माध्यमांना नुकत्याच दिलेल्या निवेदनात विचारले होते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वाखालील पथकाने मार्चमध्ये वुहानला भेट दिली होती. आरोग्य संघाच्या सदस्यांनी करोना विषाणूची उत्पत्ती शोधण्यासाठी तेथे चार आठवडे संशोधन केले होते. पण या काळादरम्यान चिनी संशोधक सावलीसारखे त्यांच्यासोबत राहिले. नंतर संयुक्त अहवालात, संघाने इतर काही प्राण्यांद्वारे करोना विषाणू मानवांमध्ये पसरण्याची शक्यता व्यक्त केली होती.