‘चित्रा वाघ कोणत्या मनोवृत्तीच्या आहेत?’; मनीषा कायंदेंची चित्रा वाघ यांच्यावर टीका

0
514

मुंबई, दि.१४ (पीसीबी) : राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांची महाराष्ट्र महिला आयोग अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांना शूर्पणखेची उपमा दिली. याच टीकेनंतर शिवसेना प्रवक्त्या डॉक्टर मनीषा कायंदे या रुपाली चाकणकर यांची ढाल म्हणून समोर आल्या आहेत. त्यांनी वाघ यांच्यावर सडकून टीका केली आहे. एका महिलेला दुसऱ्या महिलेची प्रगती झालेली आवडली नाही. चित्रा वाघ कोणत्या मनोवृत्तीच्या आहेत, हे त्यांनी दाखवून दिले आहे, असा घणाघात कायंदे यांनी केलाय.

एका महिलेला दुसऱ्या महिलेची प्रगती झालेली आवडली नाही. चित्रा वाघ यांनी आपण कोणत्या मनोवृत्तीचे आहोत हे दाखवून दिले आहे. खरंतर एक सहकारी म्हणून त्यांनी रुपाली चाकणकर यांना शुभेच्छा द्यायला हव्या होत्या. परंतु त्यांनी चाकणकर यांना शूर्पणखेची उपमा दिली. त्यांनी मत्सरी मानसिकतेचे दर्शन घडवून आणले आहे. चित्राताई वाघ यांना एखादं मानाचं पद मिळालं तर आम्ही त्यांचं अभिनंदन केलं असतं, असं कायंदे म्हणाल्या.

तसेच पुढे बोलताना त्यांनी भाजप नेते राम कदम यांचा आधार घेत चित्रा वाघ यांच्यावर थेट हल्ला केला. “राम नावाचे आमदार मुली पळवण्याची भाषा करतात. त्यावर चित्राताई वाघ मात्र काहीच बोलणार नाहीत,” असं कायंदे म्हणाल्या आहेत.

“महिला आयोगाचा अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका,” असा हल्ला चित्रा वाघ यांनी केला. तसेच चाकणकरांची निवड झाली तर प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल, अशी बोचरी टीकादेखील चित्रा वाघ यांनी केली.

दरम्यान, चित्रा वाघ यांनी केलेल्या टीकेला रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर देण्याचे टाळले आहे. “माझ्या नावावर शिक्कामोर्तब वगैरे अशा बातम्या प्रसारमाध्यमांमधून ऐकते आहे. माझ्यापर्यंत कोणतीही अशी माहिती नाही. राष्ट्रवादी महिला संघटनेचं उत्तम काम सुरु आहे. मी समाधानी आहे. इच्छा वगैरे असा काही विषय नाही. चित्राताईंच्या ट्विटवर मला काही प्रतिक्रिया द्यायची नाही”, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.