चिखलीत देशी बनावटीचे पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसांसह तरुणाला अटक

0
1073

चिखली, दि. १७ (पीसीबी) – एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसांसह एका तरुणाला गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि.१६) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चिखलीतील त्रिवेणीनगर चौकात करण्यात आली.

अविनाश भिमशा शिंगे (वय २०, रा. मिलींदनगर ओटास्किम, घर क्र. एच१/७, सर्वे क्र.२२, निगडी) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात घातक हत्यार बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी गुन्हे शाखा युनिट २ च्या पोलिस पथकाला अविनाश हा तरुण स्वत: जवळ पिस्तुल बाळगत असल्याची माहिती मिळाली होती. यावर पोलिसांनी चिखलीतील त्रिवेणीनगर चौकात सापळा रचून अविनाश याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुस आढळून आले. पोलिसांनी ते जप्त करुन अविनाश याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सतिश कांबळे अधिक तपास करत आहेत.