चिखलीत दारुच्या नशेत झालेल्या वादातून मित्रांनी केला मित्राचाच खून

0
578

चिखली, दि. १६ (पीसीबी) – दारूच्या नशेत झालेल्या वादात दोन जणांनी मित्राला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून खून केला. ही घटना चिखली म्हेत्रे वस्ती येथे घडली.

राजू नामदेव राठोड (वय ३५, रा. राजा छत्रपती कॉलनी, मोरेवस्ती, चिखली) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. चेतन वाघमारे आणि आकाश इचके या दोघांवर चिखली पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जून रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास शिवशंकर हौसिंग सोसायटी कॉलनीत टॉवरलाईन चौकात आरोपी चेतन, आकाश आणि मयत राजू हे तिघे दारूच्या नशेत होते. यावेळी त्यांच्यात वाद झाला. आरोपी चेतन आणि आकाशने राजूला ढकलून देऊन खाली पाडले. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत छाती, हात आणि अंगावर ठिकठिकाणी गंभीर दुखापत झाल्याने राजूचा मृत्यु झाला. सुरूवातीला या प्रकरणात अकस्मात मृत्यु म्हणून चिखली पोलीसांनी नोंद केली होती. मात्र, तपासात राजूचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. फौजदार फारूक सोलापूरे तपास करत आहेत.