चिखलीत चित्रपट निर्मितीमध्ये भागीदारी देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाला ३१ लाखांचा गंडा

0
971

चिखली, दि. १३ (पीसीबी) – मराठी चित्रपटात निर्माता म्हणून भागीदारी देण्याचे आमिष दाखवत एका व्यावसायिकाची ३१ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना चिखली परिसरात घडली.

याप्रकरणी लिलाधर जगनाथ वराडे (वय ५३, रा. शिवतेजनगर, चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रोहीत कांतीलाल भोसले (वय-पत्ता समजू शकला नाही) या इसमावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहीत याने लिलाधर यांना मराठी चित्रपट तयार करुन त्यासाठी रोहर्श नावाची चित्रपट निर्मितीची कंपनी तयार करुन त्यामध्ये भागीदारी देऊ व निर्माता म्हणून चित्रपटात सहभाग देऊ, असे आमिष दाखवले. त्यासाठी लिलाधर यांच्याकडून १५ लाखाची रोकड घेतली. तसेच १६ लाख रुपये ‘एनईएफटी’ व ‘आरटीजीएस’द्वारे घेतले. मात्र, लिलाधर यांनी चित्रपटाबाबतची विचारणा केल्यानंतर त्याने टाळाटाळ करण्यास सुरूवात केली. चित्रपट निर्मितीची कंपनी बंद पाडू, असे धमकावले. माझे कोणीच काहीच बिघडवू शकत नाही, असे म्हणत लिलाधर यांचा मुलगा भुपेंद्र याला हातपाय तोडण्याची धमकी दिली. याबरोबरच आरोपी रोहित याने चित्रपट निर्मितीसाठी ९ वेगवेगळ्या विभागासाठी दिलेले धनादेश देखील लिलाधर यांना दिले नाहीत. चिखली पोलीस तपास करत आहेत.