चिखलीत गुन्हे शाखेचे पोलीस असल्याचे सांगून ३२ हजारांची लाच घेताना दोघांना अटक

0
469

भोसरी, दि. १८ (पीसीबी) – मोहननगर गुन्हे शाखा युनिट ३ येथे दाखल असलेल्या गुन्ह्या प्रकरणी अटक टाळायची असल्यास १ लाख ६ हजारांची मागणी करणाऱ्या दोन ठगांना चिखली पोलिस आणि लाचलुचपत विभागाने केलेल्या संयुक्त कारवाईत ३२ हजारांची रोख आणि ७४ हजारांचा बेअरर चेक घेताना रंगेहात अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि.१७) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास चिखली येथील हॉटेल श्री परिवार येथे करण्यात आली.

याप्रकरणी रितेश लालचंद शर्मा यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार, सापळा रचून अमित रमेश मोहिते (वय २४, रा. साने कॉलनी, ज्ञानेश्वर हौसिंग सोसायटी, पहिला मजला, चिखली मोरेवस्ती) आणि त्याचा साथीदार अर्जुन अच्छेलाल विश्वकर्मा (वय २६, रा. दगडु पाटीलनगर, संत ज्ञानेश्वर कॉलनी, थेरगाव) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहिते याने फिर्यादी रितेश यांना त्याच्या विरोधात मोहननगर गुन्हे शाखा युनिट ३ येथे दाखल असलेल्या गुन्ह्या प्रकरणी अटक टाळायची असल्यास १ लाख ६ हजारांची मागणी केली होती. यावर रितेश यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावर लाचलुचपत विभाग आणि चिखली पोलिसांनी संयुक्त रित्या आरोपी अमित याला  पकडण्यासाठी चिखलीतील हॉटेल श्री परिवार येथे सापळा रचला. तसेच तडजोड अंती आरोपींनी १ लाख ६ देण्यास मान्य केले. यामध्ये ३२ हजारांची रोख आणि ७४ हजारांचा बेअरर चेकसह देण्याचे ठरले. ठरल्या प्रमाणे बुधवारी (दि.१७) आरोपींना चिखलीतील हॉटेल श्री परिवार येथे बोलवून घेण्यात आले. आणि त्यांना ३२ हजारांची रोख आणि ७४ हजारांचा बेअरर चेक घेतांना पंचांसमोर अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाचे पोलीस निरीक्षक घनशाम बळप तपास करत आहेत.