चिखलीत खंडणीसाठी भांडेविक्रेत्यांना जीवेमारण्याची धमकी; गल्ल्यातील ७ हजार घेऊन आरोपी पसार

0
599

चिखली, दि. २२ (पीसीबी) – भांड्याच्या दुकानात घुसून पाच जणांच्या टोळक्यांनी दोघांना जीवेमारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडे पाच लाखांच्या खंडणीची मागणी केली. तसेच दुकानातील भांडे रस्त्यावर फेकून देत गल्ल्यात जमा झालेली ७ हजार ३०० रुपयांची रक्कम जबरदस्तीने हिसकावून चोरुन नेली. ही घटना रविवारी (दि.२०) रात्री साडेदहाच्या सुमारास साने चौकातील साईबाबा मंदिराजवळच्या भांड्याच्या दुकानात घडली.

याप्रकरणी दुकानाचे मालक अमित महादेव साठे (वय १८, रा. भीमशक्तीनगर, स्पाईन रोड, साने चौक, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बंड्या, सुजित, आकाश, संतोष, गणेश (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमित यांचे साने चौकातील साईबाबा मंदिराजवळ भांडी विक्रीचे दुकान आहे. दुकानावर त्याचे मेहुणे आणि आई असतात. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अमित याचे मेहुणे आणि आई दुकानावर असताना बंड्या, सुजित, आकाश, संतोष आणि गणेश हे पाचही आरोपी त्यांच्या दुकानात आले. त्यांनी त्यांच्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागीतली. तसेच पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दुकानातील विक्रीसाठी ठेवलेली भांडी फेकून दिली. तसेच दुकानाच्या गल्ल्यात जमा झालेली ७ हजार ३०० रुपयांची रक्कम जबरदस्तीने चोरुन फरार झाले. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. चिखली पोलीस तपास करत आहेत.