चिखलीतील घरकुल प्रकल्पाचे काम ठप्प; मुख्य ठेकेदारांनी बिले न दिल्याने उपठेकेदारांनी कामे थांबवली

0
427

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांसाठी चिखली येथे उभारण्यात येत असलेल्या घरकुल प्रकल्पाचे काम गेल्या अकरा वर्षापासून सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत आणखी दहा इमारती उभारणे बाकी आहे. परंतु, प्रकल्पाचे काम करणाऱ्या मुख्य ठेकेदार कंपनीने प्रकल्पाच्या इतर कामांसाठी नेमलेल्या उपठेकेदारांची बिले गेल्या आठ-दहा महिन्यांपासून दिले नसल्यामुळे त्यांनी आपले काम बंद ठेवले आहे. त्यामुळे एक आठवड्यापासून संपूर्ण प्रकल्पाचे काम ठप्प झाले असून, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात आम्ही काहीही करू शकत नसल्याचे सांगत आपले हात वर केले आहे. उपठेकेदारांनी मुख्य दोन ठेकेदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यामुळे स्वस्त घरकुल प्रकल्प रखडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.