चिखलीतील एसएनबीपी इंटरनॅशनल शाळेची दादागिरी, आरटीईअंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला दिला नकार; पालकांची शाळेविरोधात महापालिकेकडे तक्रार

0
215

पिंपरी, दि. 22 (पीसीबी) : चिखली येथील एसएनबीपी इंटरनॅशनल शाळेने आरटीईअंतर्गतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास नकार दिला आहे. याप्रकरणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी मंगळवारी (दि. २) पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाचे माध्यमिक शिक्षणाधिकारी पराग मुंडे यांना निवेदन देऊन विद्यार्थ्यांना प्रवेश व शाळेवर कारवाईची मागणी केली.

चिखली येथील एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल ही शाळा आरटीईअंतर्गत नोंदणीकृत शाळा आहे. त्यामुळे आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर या शाळेत नंबर लागलेल्या आर्थिक दुर्बल घटकातील तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देणे शाळा व्यवस्थापनावर कायद्याने बंधनकारक आहे. त्यानुसार या शाळेत आरटीईअंतर्गत नंबर लागलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी मंगळवारी या शाळेत प्रवेशासाठी धाव घेतली होती. या पालकांना एसएमएसद्वारे २२ जून रोजी शाळेत जाऊन आपल्या पाल्याचा प्रवेश अंतिम करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यानुसार पालक शाळेत गेले होते.

परंतु, शाळेच्या व्यवस्थापनाने आरटीईअंतर्गत नंबर लागलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया स्थगित केल्याचे पालकांना सांगितले. त्याचे कारण पालकांनी विचारले असता व्यवस्थापनाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पालकांनी पिंपरी-चिंचवड शहर भारतीय विद्यार्थी सेनेचे उपशहरसंघटक आनंद मोरे यांच्या नेतृत्वाखाली कल्याणी दंडारे, तृप्ती वाघमारे, ज्योती हांडे, मंगेश दंडारे, रुपेश पवार, राहुल डोईजड, निलेश वाघमारे या पालकांनी मंगळवारी सकाळी पिंपरी-चिंचवड महापालिकेत धाव घेतली.

महापालिकेतील माध्यमिक शिक्षणाधिकारी पराग मुंडे यांची भेट घेऊन एसएनबीपी इंटरनॅशनल शाळेने आरटीईअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी नकार दिल्याची लेखी तक्रार केली. पराग मुंडे यांनी शाळा व्यवस्थापनाला फोन करून आरटीईचे प्रवेश न दिल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला. दोन नोटिस पाठवून नंतर शाळेची मान्यता रद्द करण्याची शिफारस राज्य सरकारकडे करू, असा दमही शाळेला भरला. आता शाळा व्यवस्थापना आरटीईचे प्रवेश देते का?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शाळेने विद्यार्थ्यांना प्रवेश न दिल्यास शाळेची मान्यता रद्द करण्यासाठी पालकांचे आंदोलन उभारण्याचा इशारा पिंपरी-चिंचवड शहर भारतीय विद्यार्थी सेनेचे उपशहरसंघटक आनंद मोरे दिला आहे.