चिंताजनक… ब्राझिलमध्ये रोज १००० कोरोना रुग्णांचा मृत्यू

0
416

बर्सिलिया, दि. १३ (पीसीबी) : मागील वर्षी ब्राझिलमध्ये कोरोना संसर्गामुळे झालेल्या मृत्यूंच्या आकड्यांमुळे जगभरात या देशाची चर्चा झाली. मृतांना पुरण्यासाठी मोठ्या प्रमाणात खड्डे खांडले जाऊ लागले तेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्राझिलमधील कोरोनाच्या गांभीर्यावर चिंता व्यक्त करण्यात आली. त्यावेळी ब्राझिलमध्ये कोरोना संसर्गाचं केंद्र मनोस शहर होतं. आता पुन्हा एकदा ब्राझिलमध्ये तिच परिस्थिती तयार झालीय. यावेळी कोरोच्या दुसऱ्या लाटेतील स्थिती अधिक गंभीर आहे. विशेष म्हणजे ब्राझिलमधील या संसर्गाच्या स्फोटाला रोखण्यात अपयश आलं तर संपूर्ण जगात कोरोना स्फोट होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

ब्राझिलमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा सातत्याने वाढत आहे. दिवस-रात्र कबरी खोदण्याचं काम सुरु आहे. जेणेकरुन मृत्यू झालेल्या कोरोना रुग्णांकडून अधिक संसर्ग न होता त्यांच्यावर लगेचच अंत्यसंस्कार करता येतील. ब्राझिल कोरोना मृत्यूंच्या यादीत सर्वात पुढे आहे. रविवारी ब्राझिलमध्ये 37,017 नवे कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळले. तसेच 1,803 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. ब्राझिलमध्ये आतापर्यंत 1 कोटी 34 लाख 82 हजार 543 प्रकरणं समोर आली होती. तसेच एकूण 3 लाख 53 हजार 293 लोकांना आपला जीव गमवावा लागला.

ब्राझिलमधील परिस्थिती नियंत्रणात न आल्यास जगभरात कोरोना स्फोटाचा धोका
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने एकूण 3 लाख पेक्षा अधिक लोकांचा बळी घेतलाय. संपूर्ण दक्षिण अमेरिकेतच ब्राझिल कोरोना संसर्गाच्या केंद्रस्थानी आहे. मागील गुरुवारी येथे विक्रमी 4,247 रुग्णांचे मृत्यू झाले. एप्रिलमध्ये हाच मृतांचा दैनंदिन आकडा 5,000 पर्यंत पोहचण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केलीय. या नव्या कोरोना रुग्णांमध्ये बहुतांश रुग्ण कोरोनाच्या नव्या पी1 व्हॅरिएंटचे असल्याचं समोर आलंय. हा व्हॅरिएंट ब्राझिलमधील अमेझॉनशी संबंधित आहे. ब्राझिलला देशातील कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवता आलं नाही, तर तो संपूर्ण जगासाठी मोठा धोका असेल असा इशारा तज्ज्ञ देत आहेत. कोरोना विषाणूचा खुला संसर्ग होत राहिला तर पहिल्यापेक्षा अधिक धोकादायक व्हेरियंटचा जन्म होऊ शकतो, असंही नमूद संशोधकांनी सांगितलंय.

ब्राझिलच्या राष्ट्रपतींकडून आधी कोरोनालाच नकार, आता लॉकडाऊनकडेही दुर्लक्ष
ब्राझिलचे विद्यमान राष्ट्रपती जेयर बोल्सोनारो यांच्यावर जगभरातून कोरोना परिस्थिती हाताळण्यात आलेल्या अपयशामुळे टीका होतेय. विशेष म्हणजे त्यांनी सुरुवातीला तर कोरोना या साथीरोग असण्यालाच नकार दिला. त्यानंतर मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊन सारख्या उपाययोजनांनी मागणी होऊनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. एकूणच त्यांच्याकडून वैज्ञानिक गोष्टींकडे डोळेझाक केली जात आहे आणि त्याची किंमत सर्वसामान्य लोकांना मोजावी लागत असल्याचं चित्र ब्राझिलमध्ये आहे.