Chinchwad

चिंचवड, बिजलीनगरमध्ये नवीन पाईपलाईन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

By PCB Author

November 24, 2018

चिंचवड, दि. २४ (पीसीबी) – चिंचवडमध्ये पिण्याच्या पाण्याची नवीन पाईपलाइन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. बिजलीनगरकडून चिंचवडगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर रस्टन कॉलनीसमोर शनिवारी (दि. २४) सकाळी ही पाईपलाइन फुटली. पिंपरी-चिंचवड शहराला पाणी अपुरे पडत असल्याने नागरिकांना विस्कळित पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत शहरात पाईपलाइन फुटून पाणी वाया जाण्याचे प्रकार वाढल्याने उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवण्याची शक्यता आहे.

बिजलीनगर ते चिंचवडकडे जाणाऱ्या रस्त्यावर महापालिकेने पिण्याच्या पाण्याची नवीन पाईपलाइन टाकली आहे. शनिवारी सकाळी या पाईलाइनमधून लाखो लिटर पाणी वाया गेले. या पाईपलाइनची तपासणी सुरू असताना हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. परंतु, ठेकेदाराने फुटलेली पाईपलाइन टाकली होती का?, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. या पाईपलाईनची दुरूस्ती करण्याचे काम सुरू आहे. परंतु, तोपर्यंत पिण्याच्या पाण्याची मोठी नासाडी झाली आहे.

पवना धरणातून शहराला केला जाणारा पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. त्यामुळे शहरवासीयांना विस्कळित पाण्याचा सामना करावा लागत आहे. अनेक भागात पुरेसे पाणी येत नसल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत शहराच्या वेगवेगळ्या भागात महापालिकेच्या पाईपलाईन फुटण्याचे प्रकार वाढले आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. परिणामी उन्हाळ्यात शहराला पाण्याची तीव्र टंचाई जाणवण्याची शक्यता आहे.