चिंचवड पोलीस ठाण्यात धिंगाणा घालणाऱ्या त्या दोन मुलींना पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी

0
4244

चिंचवड, दि. ३१ (पीसीबी) – दारू पिऊन मध्यरात्रीच्या सुमारास  रस्त्यावर पोलिसांशी हुज्जत घालून चिंचवड पोलीस ठाण्यात धिंगाणा घालणाऱ्या दोन मुलींसह एका तरुणाला पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडीची शिक्षा मोरवाडी न्यायालयाने सुनावली आहे.

प्रिया प्रदीप पाटील (वय ३०, रा. अंजिनाथा हाऊसिंग सोसायटी, पाटीलनगर, चिखली), स्मिता किशोर बाविस्कर (वय २२, रा. सेक्टर नंबर २२, ओटास्कीम, निगडी) आणि आकाश मिलिंद कोरे (वय २५, रा. कोकणे कॉलनी, नढे नगर, काळेवाडी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड पोलीस गुरुवारी (दि. ३०) मध्यरात्री पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डन समोर प्रिया, स्मिता आणि आकाश हे तिघेजण संशयितरित्या थांबलेले आढळून आले. त्यांच्याजवळ एक नंबर नसलेली दुचाकी होती. त्यामुळे पोलिसांनी त्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली. मात्र त्यांनी पोलिसांना उलटसुलट उत्तरे दिली आणि हुज्जत घातली. यावर चिंचवड पोलिसांनी त्या तिघांनाही चिंचवड पोलीस ठाण्यात नेले. तरुणींनी तेथेही पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत आरेरावीची भाषा करुन जोरजोरात आरडा ओरड करुन धिंगाना घातला. पोलिसांनी हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद करुन तिघांनाही अटक केली. त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता तिघांनीही दारु पिल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्यांना मोरवाडी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांनाही पंधरा दिवसांची  न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली आहे.