Pune

चिंचवड देवस्थान गैरव्यवहार प्रकरणात सहाय्यक पोलिस आयुक्तसह दोन पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हा

By PCB Author

September 28, 2022

– मुख्य आरोपी राष्ट्रवादीचे नेते पोपट तावरे यांना मदत करणे पोलिसांना भोवले

पुणे, दि. २८ (पीसीबी) : चिंचवड देवस्थानच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात मोठी कारवाई करण्याचे आदेश आता खुद्द न्यायालयानेच दिले आहेत. पुण्याचे सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्यासह दोन पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे दौंड न्यायलयाचे आदेश दिले आहेत. पुणे जिल्ह्यातील चिंचवड देवस्थान ट्रस्ट जमीन खरेदी विक्री गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. शिरगावकर यांच्यासह यवतचे तत्कालीन पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक पद्माराज गंपले आणि राष्ट्रवादीचा नेता पोपट तावरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे पोलिस विभागात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, देवस्थानच्या शेकडो एकर जमिनी काही राजकीय मंडळी आणि बिल्डरने लाटल्याची अनेक प्रकरणे आता चर्चेत आली आहेत.

काय आहे प्रकरण ? – अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव येथे चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या मालकीची शेकडो एकर जमीन खरेदी-विक्री प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते पोपट तावरे यांना मदत करणे पोलिसांना भोवले आहे. पोपट तावरे यांची किरण शांताराम भोसले आणि आरती लव्हटे यानी यवत पोलिसांनाकडे तक्रार केली होती. पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून घेतल्यानंतर राजकीय दबावामुळे यातील मुख्य आरोपी असलेल्या पोपट तावरे यांस क्लीन चीट दिली होती. आणि या गुन्ह्यात त्यांचा सहभाग नाही असं न्यायालयास दर्शविले होते. परंतु, पोपट तावरे हे खरेदीदार असतानाही हेतूपूर्वक त्यांना बाजूला ठेवण्यासाठी संबंधित आरोप असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी खोटे कागदपत्रे न्यायालयात सादर केली. याबाबत फिर्यादीने न्यायालयात दाद मागितली होती.

यावर दौंड येथील न्यायालयाने महत्वाची निरीक्षण नोंदवली असून पोलिसांनी तावरे यांना तीन गुन्ह्यातून निर्दोष सोडल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच न्यायालयाने नारायण शिरगांवकर, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक पद्मराज गंपले, राष्ट्रवादीचा नेता पोपट तावरे यांच्यावर, कलम 420,464,120ब,192,192,196 अशा विविध गंभीर कलमनुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.