चिंचवड देवस्थानच्या इनाम जमिनी देवस्थानच्या नावावर करा; आरटीआय कार्यकर्त्यांचे आंदोलन

0
907

चिंचवड, दि. २९ (पीसीबी) – चिंचवड देवस्थानच्या जमीनींचा घोटाळा झाला असून, बेकायदेशीर मार्गाने हडपलेल्या या जमिनी संस्थानला परत मिळाव्यात. जमिनी हडपणाऱ्या भूमाफियांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी चिंचवड देवस्थानच्या कार्यालयासमोर बुधवारी (दि. २९) आंदोलन केले.

चिंचवड देवस्थानची वेगवेगळ्या गावांमध्ये एकूण १ हजार ६४० एकर जमीन आहे. या सर्व जमिनी इनाम जमिनी आहेत. बॉम्बे ट्रस्ट अॅक्ट १९५० नुसार या सर्व इनाम जमिनींची नोंद चिंचवड देवस्थान ट्रस्ट या संस्थानच्या मालमत्तांमध्ये नोंद करणे बंधनकारक आहे. माहिती अधिकार कायद्यात दिलेल्या माहितीनुसार मौजे वाकड येथील इनाम वर्ग ३ जमिनीची नोंद चिंचवड देवस्थानच्या मालमत्तांमध्ये नोंद केलेली नाही. या जमिनीचा बेकायदेशीर व्यवहार किंवा टीडीआर हस्तांतरण होऊ नये म्हणून मुख्यमंत्री, राज्याचे मुख्य सचिव, पुणे धर्मादाय आयुक्त तसेच पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त यांच्यासोबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

ही जमीन संस्थानच्या मालमत्तांमध्ये नोंद करण्याची अद्याप कार्यवाही न झाल्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्ते शंतनु नांदगुडे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी चिंचवड देवस्थानच्या चिंचवड येथील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये प्रमोद शिंदे, सागर देव, गणेश देव, अमोल उबाळे, मनीष वाघमारे, संदिप चव्हाण, भारत मिरपगारे, मारूती जाधव, संगिता शहा, रुहिनाज शेख, शबाना शेख, बालिका गुरव आदींनी सहभाग घेतला.