चिंचवड गावठाणातील विकासकामे कूर्म गतीने; नागरिकांना नाहक मनस्ताप नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांच्या झाडाझडतीनंतर प्रशासन लागले कामाला

0
251

चिंचवडगाव, दि. २९ (पीसीबी) – चिंचवड गावठाण प्रभाग क्र. 18 मध्ये हेरिटेज प्रकल्पांतर्गत मागील तीन महिन्यांपासून सुरू असलेली विकासकामे अत्यंत कूर्म गतीने सुरू असल्यामुळे संपूर्ण गावठाणात पसरलेल्या राडारोड्यामुळे गावठाणातील रहिवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. अखेर नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांनी यासंदर्भात प्रशासकीय यंत्रणा आणि ठेकेदाराची झाडाझडती घेतल्यानंतर प्रशासन कामाला लागले आहे.

यासंदर्भात नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांनी आयुक्त श्रावण हार्डीकर यांची भेट घेत गावठाण परिसरात सुरू असलेल्या कामाच्या सद्यस्थितीचे फोटो दाखवून परिस्थिती त्यांच्या लक्षात आणून दिली. व यासंदर्भात तातडीने हालचाल करण्याची विनंती केली. यावेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, प्रभाग अध्यक्ष मिथुन बोरगाव, सांस्कृतिक आघाडीचे शहराध्यक्ष धनंजय शाळीग्राम, युवा मोर्चाचे सरचिटणीस अजित कुलथे, अनिकेत पायगुडे, केदार बावळे, अतुल पडवळ ,सागर गरुड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

यासंदर्भात बोलताना नगरसेवक शेडगे म्हणाले की, चिंचवड गावठाण या ठिकाणी सुरू असलेल्या विविध विकासकामामुळे येथील नागरिकांचे वैयक्तिक फार मोठे नुकसान झाले आहे. तरीही नागरिक प्रशासनाला सहकार्य करीत आहेत. मात्र सदर कामे अत्यंत संथगतीने सुरू असल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे, अशी तक्रार त्यांनी यावेळी केली.

दरम्यान, आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत सदर कामासंदर्भात चालढकलपणा न करता तातडीने गावठाणातील सर्व विकासकामे पूर्ण करण्याचे व नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याचीही काळजी घेण्याची आदेश दिले.