Bhosari

चिंचवड केएसबी चौकात दहशत माजवण्यासाठी टोळक्यांकडून दुचाकीची तोडफोड

By PCB Author

December 10, 2018

चिंचवड, दि. १० (पीसीबी) – परिसरात दहशत माजवण्यासाठी पाच जणांच्या टोळक्यांनी एका दुचाकीची तोडफोड करुन नुकसान केले. ही घटना शनिवारी (दि.८) सायंकाळी सव्वानऊच्या सुमारास चिंचवड केएसबी चौकातील हॉटेल गोल्डन रक समोर घडली.

याप्रकरणी रामकृष्ण कान्हुकर (वय ४३, रा. ए ७, करवीन हौसिंग सोसायटी, ज्ञाहुनगर, चिंचवड) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संदीप कालीदास भोसले (वय २१, रा. विद्यानगर बस स्टॉपच्या, पाठीमागे, चिंचवड), रितेश जाधव, कृष्णा जगताप, बंटी तुपे आणि रतन काळे या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी सव्वानऊच्या सुमारास चिंचवड केएसबी चौकातील हॉटेल गोल्डन रक समोर फिर्यादी रामकृष्ण यांनी त्यांची दुचाकी पार्क केली होती. यावेळी आरोपी संदीप भोसले, रितेश जाधव, कृष्णा जगताप, बंटी तुपे आणि रतन काळे या पाच जणांनी मिळून परिसरात दहशत माजवण्यासाठी फिर्यादी यांच्या दुचाकीची कोयता, लाकडी दांडके आणि स्टंपने तोडफोड करुन नुकसान केले. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पाचही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संदीप भोसले याला अटक केली असून इतर चौघेजण फरार आहेत. भोसरी एमआयडीसी पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.