चिंचवडमध्ये हृदयाची शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णाने केली सव्वा लाखांची चोरी

0
681

चिंचवड, दि. १८ (पीसीबी) – हृदयाची शस्त्रक्रिया करण्यासाठी एका ५४ वर्षीय रुग्णाने दुचाकीच्या डिक्कीतील सोन्याच्या बांगड्या आणि मोबाईल असा एकूण १ लाख २२ हजार ५९६ रुपयांची चोरी केल्याचे पिंपरी पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

अनिल सॅमियल गायकवाड (वय ५४, रा. पाटील चौक, दौंड) असे अटक करण्यात आलेल्या या रुग्णाचे नाव आहे. याप्रकरणी अमोल प्रकाश रावळ (वय ३६, रा. चिखली) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमोल हे गुरुवारी (दि.७ मार्च) रोजी सायंकाळी सातच्या सुमारास चिंचवड स्टेशन चौकातील प्रदीप स्वीट दुकानासमोर दुचाकी पार्क करून खाद्यपदार्थ खरेदीसाठी गेले होते. यावेळी आरोपी अनिल याने अमोल यांच्या दुचाकीची डिक्की उघडून त्यातील दोन सोन्याच्या बांगड्या, एक मोबाईल फोन असा एकूण १ लाख २२ हजार ५९६ रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अमोल यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

याप्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे माहिती गोळा केली. तर चोरी करणारा आरोपी हा अनिल असल्याचे समोर आले. तसेच तो मूळचा दौंडचा असून तो त्याच्या हृदयाच्या उपचारासाठी पुण्यात आला होता; अशी माहिती पोलिसांनी मिळाली होती. यावर पोलिसांनी छडा लावत थेरगाव येथून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याला हृदयाशी संबंधित आजार आहे. त्याच्या उपचारासाठी तो पुण्यात आला होता. त्याच्याकडे उपचारासाठी पैसे नसल्याने त्याने हे पाऊल उचलले असल्याचे, पोलिसांसमोर कबुल केले. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचा ऐवज जप्त केला आहे. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.