चिंचवडमध्ये लेखापालाने कंपनीला घातला सव्वादोन कोटींचा गंडा

0
600

चिंचवड, दि. १६ (पीसीबी) – लेखापालाने कंपनीसाठी येणारा माल कंपनीत न आणता व्यापाऱ्यांशी संगनमत करून बाहेरच्या बाहेर विकला तसेच कंपनीच्या नावाचा बनावट रबरी शिक्का तयार करून कंपनीला तब्बल सव्वादोन कोटीचा गंडा घातला. ही फसवणुक चिंचवड औद्योगगिक परिसरातील सुरेश प्रेस वक्र्स या कंपनीत घडली.

याप्रकरणी सुशिल सुरेश वाढोकार (वय २५, रा. जय गणेश प्लॉट, टिळक रोकड, प्राधिकरण, निगडी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अभिजीत सुरेश रानवडे (वय ४१, रा. दोस्ती निवास, औंध) असे गुन्हा दाखल झालेल्या लेखापालाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुशिल यांची चिंचवड एमआसडीसीत डी ब्लॉकमध्ये सुरेश प्रेस वक्र्स या नावाने कंपनी आहे. आरोपी अभिजीत हा या कंपनीत लेखापाल म्हणून काम करतो. त्याने इंजिनिअरींग वक्र्स आणि स्टील ट्युब कॉर्पोरेशन या कंपन्यांकडून माल घेताना कंपनीच्या परवानगी शिवाय पाईप आणि पाईप अ‍ॅण्ड फिटींग या मालाची किंमत वाढवून देऊन कंपनीचे नुकसान केले. तसेच कंपनीत येणारा माल बाहेरच्या बाहेर व्यापाऱ्यांशी संगनमत करून विकून विल्हेवाट लावली आणि बेकायदेशीरपणे पैसे कमावले. कंपनीतून काम सोडून गेलेल्या कामगाराचा इ-मेल आयडी आणि पासवर्ड वापरून कंपनीच्या संगणकातील बील ऑफ मटेरियलमध्ये फेरफार केला. माल वापरला गेल्याच्या खोट्या नोंदी केल्या. कंपनीचा बनावट रबरी शिक्का तयार करून माल मिळाल्याची पोहोच देण्यासाठी वापर केला आणि आपल्या पदाचा गैरवापर करून कंपनीची तब्बल २ कोटी २४ लाख ५३ हजार रूपयांची फसवणूक केली. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.