पोलीसात तक्रार दिली म्हणून चिंचवडमधील महिलेला घरात घुसून धमकी

0
694

चिंचवड, दि. १६ (पीसीबी) – पोलीसात तक्रार दिली म्हणून एका ३२ वर्षीय महिलेच्या घरात घुसून तिला अश्लील भाषेत शिवीगाळ करुन, ‘पुन्हा पोलीसात तक्रार दिल्यास तुझ्या इज्जतीची वाट लावेन’ अशी धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि.१०) दुपारी अडीचच्या सुमारास चिंचवड येथील पवनानगर सिल्व्हर गार्डन येथे महिलेच्या घरात घडली.

याप्रकरणी पीडित ३१ वर्षीय महिलेने चिंचवड पोलीसात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार गणेश उर्फ चेतन बाळासाहेब भुजबळ (रा. जाधववाडी, चिखली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपूर्वी पीडित ३१ वर्षीने महिलेने आरोपी गणेश विरोधात पोलिसात तक्रार केली होती. याचा राग मनात धरुन बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास गणेश हा महिलेच्या घरात शिरला. त्याने ‘ तु पुन्हा पोलीसात तक्रार दिल्यास तुझ्या इज्जतीची वाट लावेन’, अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. महिलेने आरडाओरड केल्याने गणेश तेथून पसार झाला. याप्रकरणी महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. चिंचवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सी.जाधव तपास करत आहेत.