चिंचवडमध्ये घरात घुसून टोळक्यांनी केली कुटुंबाला जबरमारहाण; महिला जखमी

0
1677

चिंचवड, दि. ४ (पीसीबी) – किरकोळ वादातून झालेल्या भांडणामुळे तीघा टोळक्यांनी घरात घुसून एकाच कुटुंबातील चौघांना जबर मारहाण केली. मारहाणीत जखमी झालेल्यांमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. ही घटना रविवारी (दि.२) सायंकाळी सात ते रात्री दहाच्या दरम्यान चिंचवड दत्तनगर येथील विष्णु प्रोव्हिजन स्टोअर्सच्या समोर घडली.

वडिल केशव गुप्ता, मुलगा सुनिल गुप्ता, अनिल गुप्ता आणि आई रामरती असे मारहाणीत जखमी झालेल्या एकाच कुटुंबातील चौघांची नावे आहेत. याप्रकरणी सुनिल याने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अभिषेक प्रकाश गणगाव (वय १९) आणि त्याचे दोन साथीदार रज्जाक मोहम्मद शेख (वय ४०)  आणि नागेश वाघमारे उर्फ काळ्या (सर्व रा. दत्तनगर चिंचवड) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनिल गुप्ता या तरुणाचा आरोपी अभिषेक, रज्जाक आणि नागेश या तिघांसोबत रविवारी सायंकाळच्या सुमारास किरकोळ कारणावरुन भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरुन आरोपी रात्रीच्या सुमारास सुनिल याच्या घरात घुसले. त्यांनी शिवीगाळ करत सिमेंटच्या गट्टून सुनिल याचा मोठा भाऊ अनिला आणि वडिल केशव यांना जबर मारहाण केली. तसेच आई रामरती यांच्या डोक्यात दुधाचा ट्रे मारुन गंभीर जखमी करुन फरार झाले. याप्रकरणी आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक पालांडे तपास करत आहेत.