चिंचवडमध्ये गँगवॉर; आकाश लांडगे खून प्रकरणातील संशयितावर कोयत्याने खुनी हल्ला

0
6905

चिंचवड, दि. १७ (पीसीबी) – चिंचवड येथील आकाश लांडगे खून प्रकरणातील संशयित आरोपी सिध्देश शेलार याच्यावर पाच जणांच्या टोळक्यांनी कोयत्याने खूनी हल्ला केला. या हल्ल्यात सिध्देश गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (दि.१६) दुपारी साडेतीनच्या सुमारास चिंचवड येथील मोरया गोसावी क्रीडांगणात घडली.

याप्रकरणी चिंचवड पोलीसांनी अजय उर्फ बेडक्या कांबळे, जॉनी उर्फ आशितोष जगताप या दोघांना अटक केली असून त्यांचे इतर तीन साथीदार फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार (दि.२९ मे २०१८) च्या रात्री चिंचवड चापेकर चौकात घोलप टोळीतील आकाश लांडगे याचा रणजित चव्हाण, स्वप्नील ऊर्फ बाबा मोरे आणि त्यांच्या साथीदारांनी धारदार हत्यारांनी वार करुन खून केला होता. खून करण्याच्या आधि आणि नंतर आरोपींनी सिध्देश शेलार याला फोन केला होता. यामुळे सिध्देशला पोलिसांनी अटक देखील केले होते. मात्र घोलप टोळीला सिध्देशच्या सांगण्यावरुनच आकाशचा खून करण्यात आल्याचा संशय होता. यातूनच रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास चिंचवड येथील मोरया गोसावी क्रीडांगण येथे क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या सिध्देश याला तोंडाला रुमाल बांधून आलेल्या अजय उर्फ बेडक्या कांबळे, जॉनी उर्फ आशितोष जगताप आणि त्याच्या साथीदारांनी कोयत्याने डोक्यात प्राणघात वार केले. यामध्ये सिध्देश गंभीर जखमी झाला. तसेच त्याला वाचवण्यासाठी आलेल्या मित्रांना देखील जबर मारहाण करण्यात आली. चिंचवड पोलीसांनी अजय उर्फ बेडक्या कांबळे, जॉनी उर्फ आशितोष जगताप या दोघांना अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.