चिंचवडमध्ये इलेक्ट्रीक  करवतीने  पाय कापला गेल्याने कामगाराचा मृत्यू

1218

चिंचवड, दि. ११ (पीसीबी) – लाकूड कापण्याच्या इलेक्ट्रिक करवतीमुळे पाय कापला गेल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि.७) सकाळच्या सुमारास चिंचचवड येथे घडली.

संजय शंकर कांबळे (वय ४५, रा. जय मल्हारनगर, थेरगाव) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी किरण संजय कांबळे (वय २३) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ठेकेदार मल्लप्पा महादेव नरळे (वय ३७, रा. श्रीकृष्ण कॉलनी, कोकणेनगर, काळेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळे यांना लाकूड कापण्याच्या मशिनचे कोणतेही प्रशिक्षण नव्हते. तरी देखील ठेकेदार नरळे याने कांबळे यांना बुधवारी (दि.७) सकाळी दहाच्या सुमारास साधनसामग्रीशिवाय काम करण्यास सांगितले. यावेळी लाकूड कापण्याची मशिन कांबळे यांच्या डाव्या पायाच्या मांडीला लागली. त्यामुळे त्यांचा पाय कापला गेला आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी ठेकेदार मल्लप्पा नरळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अभिजित जाधव तपास करत आहेत.