Pimpri

“चिंचवडमधील ‘हेरिटेज’चे काम दगडी न करता सिमेंट काँक्रीटचे करावे” – अश्विनी चिंचवडे

By PCB Author

January 27, 2021

पिंपरी, दि.27(पीसीबी) – चिंचवडमधील हेरिटेजचे काम दगडी ( कोबल सरफेस ) न करता सिमेंट काँक्रीटचे करावे. केवळ चौकामध्ये हेरिटेज धर्तीवर सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना नगरसेविका अश्विनी चिंचवडे-पाटील यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात नगरसेविका चिंचवडे यांनी म्हटले आहे की, चिंचवड मधील सर्व रस्त्यांची उंची डांबरीकरणामुळे वाढत आहे. त्यामुळे आणि वारंवार खोदाईमुळे पाण्याची लाईन, विद्युत केबल, ड्रेनेज लाईन, स्ट्रॉमवॉटर लाईन, एमएनजीएल या सेवावाहिन्यांच्या दोन्ही बाजूला सिमेंट काँक्रिटीकरण करणे असे लेखाशीर्ष व अंदाजपत्रकात तरतूद तत्कालीन आयुक्त आणि आम्ही सर्व नगरसेवकांनी 2016-17 च्या अंदाजपत्रकात केली होती.

आपण आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर चिंचवड सिमेंट काँक्रिटीकरणाची फाईल दोन वर्ष प्रलंबित ठेवली. लखनऊच्या धर्तीवर दगडी कोबल सरफेस पद्धतीने विकसित करण्याबाबत निर्णय घेण्यात वेळ वाया घालवला.

आयुक्तसाहेब आपण निर्णय वेळेवर न घेता सुरुवातीपासून दगडी (कोबल सरफेस) कामाबाबत आग्रही राहिलात. आमची मागणी होती की सर्व ठिकाणी दगडी (कोबल सरफेस) न करता फक्त चौका- चौकामध्ये दगडी काम (कोबल सरफेस) तसेच विद्युत विभाग वगळून आपण अर्धवट निविदा प्रक्रिया केली, त्यामध्ये विद्युत कामाचा समावेश केला नाही.

त्यामुळे चिंचवड मधील नागरिकांना आजदेखील वारंवार वीजपुरवठा खंडित होऊन नाहक त्रास सहन करावा लागत आहे.   याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर दुस-या टप्प्याचे व विद्युतच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. महापालिका प्रशासनाच्या या वेळकाढू धोरणामुळे आम्ही लोकप्रतिनिधी व चिंचवडकर नागरीक त्रस्त झालो आहोत. कोबल सरफेस (दगडी काम ) न करता सिमेंट काँक्रिटीकरण करावे. केवळ चौकात हेरिटेज धर्तीवर सुशोभीकरण करण्यात यावे. विद्युत पोल अँटिक,ऐतिहासिक पध्दतीचे बसवावेत. या कामाचा आठ दिवसात निर्णय घ्यावा, अन्यथा आम्हा चिंचवडकरांना आंदोलनाची तीव्र भूमिका घ्यावी लागेल, अशा इशाराही नगरसेविका चिंचवडे यांनी दिला आहे.