चिंचवडमधील दळवीनगरमध्ये गॅस सिलेंडरच्या स्फोटात दोघांचा होरपळून मृत्यू; पाच झोपड्या जळून खाक

0
1557

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – चिंचवडमधील दळवीनगर झोपडपट्टीत गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला. गुरूवारी (दि. २५) पहाटे ही भीषण घटना घडली. या आगीत पाच झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाचे पथस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवले.

प्रदीप मेटे (वय ३२) आणि शंकर क्षीरसागर (वय ३५) अशी आगीत होरपळून मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. यातील शंकर क्षीरसागर हा तृतीयपंथी आहे.

दळवीनगरमधील एका झोपडपट्टीत गुरूवारी पहाटे गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे भीषण आग लागली. या आगीत पाच झोपड्या जळून खाक झाल्या. तसेच दोघाचा होरपळून मृत्यू झाला. शंकर क्षीरसागर या तृतीयपंथीयाला भेटण्यासाठी प्रदीप मेटे रात्री उशिरा त्यांच्या घरी गेले होते. परंतु, सिलेंडर स्फोटामुळे पहाटे लागलेल्या आगीत या दोघांनाही आपला जीव गमवावा लागला.

शंकर क्षीरसागरसोबत भाचा, आई, बहीण, दाजी असा मोठा परिवार घरात एकत्र राहतात. हे सर्वजण भीषण आगीतून बचावले आहेत. आगीची घटना कळताच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे.