Chinchwad

चिंचवडमधील आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या मुजोरपणाविरोधात सामाजिक कार्यकर्त्यांचे रुग्णालयासमोर आंदोलन

By PCB Author

August 30, 2018

चिंचवड, दि. ३० (पीसीबी) – चिंचवड येथील आदित्य बिर्ला रुग्णालय तसेच धर्मादाय आयुक्त कार्यालयांतर्गत येणाऱ्या पुणे व पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयांच्या मुजोरपणाच्या विरोधात धर्मादाय रुग्णालय संघर्ष समिती तसेच विविध राजकीय पक्ष, संघटनांच्या वतीने गुरूवारी (दि. ३०) आदित्य बिर्ला रुग्णालयासमोर आंदोलन करण्यात आले. आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी सरकारने केलेल्या कायद्याची व नियमांची आदित्य बिर्लांसह अन्य मुजोर रुग्णालयांनी काटेकोर अंमलबजावणी करावी यासाठी सरकारने कायद्याचा बडगा उगारावा, अशी मागणी आंदोलकांच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली.

या आंदोलनाच्या सुरूवातीला आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या त्रासामुळे मरण पावलेल्या आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांना आंदोलकांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर रुग्णालयाच्या दारासमोर आंदोलकांनी आंदोलन केले. रुग्णालयाच्या मुजोर कारभाराच्या विरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, अजिज शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलकांनी दिवसभर आंदोलन केल्यानंतर पुणे जिल्हाधिकारी तसेच पिंपरी-चिंचवड व पुणे पोलिस आयुक्तांना मागण्यांचे निवेदन दिले.

धर्मादाय कार्यालयांतर्गत येणाऱ्या रुग्णालयांच्या नावापुढे धर्मादाय रुग्णालय असा उल्लेख करावा, रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी स्वतंत्र कार्यालय व मदतनीस २४ तास उपलब्ध करावे, अशा रुग्णांना मोफत व सवलतीत उपचार नाकारणाऱ्यांना रुग्णालयांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावे, आर्थिक व दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी दिल्या जाणाऱ्या सेवा व सुविधा तसेच दाखल रुग्णांची इत्थंभू आयपीएफ माहिती फलक रुग्णालयाच्या दर्शनी भागात दररोज लिहिण्यात यावे, धर्मादाय योजनेतून लाभ घेण्यासाठी रुग्णाला आवश्यक कागदपत्रे, त्यांची पुर्तता, नियम व अटींचा सूचना फलक रुग्णालयांच्या प्रवेशद्वारावर लावण्यात यावा, रुग्णाला उपचार नाकारताना रुग्णालयाला येणाऱ्या अडचणी व समस्या संबंधित रुग्णाला व त्यांच्या नातेवाइकांना लेखी देण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.