चिंचवडगावात पहिल्यांदाच तुकाराम महाराजांची पालखी महासाधू मोरया गोसावी यांच्या भेटीला!

0
808

चिंचवड, दि. ८ (पीसीबी) – जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची आषाढी  वारीसाठी गेलेली पालखी आज (बुधवार)  पंढरपूरहून देहूकडे  परत असताना चिंचवडगावातील गांधी चौकात सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास काही वेळेसाठी विसावली. यावेळी महासाधू मोरया गोसावी आणि संत तुकाराम महाराज यांच्या अपूर्व भेटीचा सोहळा ‘याची देही, याची डोळा’ अनुभवण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावर्षी पहिल्यांदाच या पालखीने चिंचवडगावात पाहुणचार घेतला. त्यानंतर तुकोबांची पालखी देहूकडे मार्गस्थ झाली.

टाळ-मृदंगाच्या गजरात…तुकोबा- ज्ञानोबा यांच्या जयघोषात चिंचवडकरांनी  पालखीचे दर्शन घेतले.  यावेळी पालखी सोहळा प्रमुख सुनील मोरे, मंदार देव महाराज आदी उपस्थित होते. यावेळी महासाधू मोरया गोसावी आणि ज्ञानोबा – तुकोबा यांचा जयघोषाने करण्यात आला. त्यानंतर वारकऱ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले.

यावेळी मंदार देव महाराज यांच्या हस्ते तुकाराम महाराजांची आरती करण्यात आली. पालखी सोहळा प्रमुख सुनील मोरे यांचा सत्कार देव महाराजांच्या हस्ते करण्यात आला. तसेच महासाधू मोरया गोसावी आणि संत तुकाराम महाराज यांच्या भेटीचे एक शिल्प पालखी सोहळा प्रमुख सुनील मोरे यांना भेट देण्यात आले.