चालत्या शिवशाही बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले बारा प्रवाशांचे जीव

0
1268

नाशिक, दि. १२ (पीसीबी) – शिवशाही या स्लीपर कोच बसच्या इन्व्हर्टरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने लागलेल्या आगीत बस जळून खाक झाली. ही घटना रविवारी (दि. ११) रात्री आठच्या सुमारास ओझर महामार्गावरील गरवारे पॉईंटवर घडली. सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सर्व बारा प्रवासी बचावले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री आठच्या सुमारास एसटी महामंडळाची नाशिक-इंदूर ही शिवशाही बस (एमएच/१८/बीजी/२१३५) १२ प्रवासी घेऊन मुंबई-आग्रा महामार्गाने इंदूरकडे जात असताना चालकाच्या शेजारी असलेल्या मशिनच्या बोनटमधून धूर निघत असल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. यावर चालक गोरख सवंडगीर यांनी प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या कडेला नेली. वाहकाच्या लक्षात ही बाब आणून दिल्याने वाहकाने तत्काळ प्रवाशांना बाहेर पडण्यास सांगितले.

सर्व प्रवासी बसच्या बाहेर येत नाही तोपर्यंत चालकाने बॉनेट उघडून आग विझवण्याचा प्रयत्न केला. प्रवासी आपल्या बॅगा काढून घेत असताना आग आणखी भडकल्याने चालकाने आपत्कालीन मार्गातून उडी मारत आपला जीव वाचवला. सर्व प्रवासी सुखरूप असल्याची खात्री करत घटनेची माहिती पोलीस आणि अग्निशामक दलाला देण्यात आली. मात्र अग्निशामक दल पोहचे पर्यंत संपूर्ण बस जळून खाक झाली होती. जवानांनी अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले.