Maharashtra

चार वर्षांच्या चिमुरडीवर अतिप्रसंग, गोणीत बांधून फेकून दिले

By PCB Author

December 21, 2020

वसई, दि. २१ (पीसीबी) : वसईत वालीव पोलिसांच्या सतर्कतेमुळे चार वर्षांच्या मुलीला जीवनदान मिळाले. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन वसईच्या सर डी. एम. पेटिट रुग्णालयात तिची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर अतिप्रसंग झाला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

वसईच्या फादरवाडी परिसरात पीडित चार वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन, तिच्यावर अतिप्रसंग करुन तिला जिवंत गोणीत बांधून टाकून दिले होते. काल (20 डिसेंबर) सायंकाळी 6 च्या सुमारास वसईच्या फादरवाडी परिसरात एक संशयित गोणी असल्याची माहिती वालीव पोलिसांना मिळाली होती. वालीवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले आणि त्यांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन, गोणी सोडून पाहिली असता त्यात जिवंत मुलगी असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.

पोलिसांनी तात्काळ वरिष्ठांच्या आदेशावरुन पीडित मुलीला वसईच्या सर डी. एम. पेटिट रुग्णालयात तात्काळ प्राथमिक उपचारासाठी दाखल केले असता तिच्यावर अतिप्रसंग झाला असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

वालीव पोलिसांनी पीडित मुलीची ओळख पटविण्यासाठी मीरा-भाईंदर-वसई-विरार आयुक्तालय हद्दीतील पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता संबधित पीडित मुलीचा भाईंदर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. यावरुन पीडित मुलीला रात्री उशिरा भाईंदर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती वालीव पोलिसांनी दिली आहे. आता या घटनेचा अधिकचा तपास हे भाईंदर पोलीस करणार आहेत.