चारा नसेल, तर जनावरे पाहुण्यांकडे नेऊन बांधा; पालक मंत्री राम शिंदेंचा अजब सल्ला

0
785

अहमदनगर, दि. ६ (पीसीबी) – चारा नसेल, तर जनावरे पाहुण्यांकडे नेऊन सोडा, असा अजब सल्ला देणाऱ्या जलसंधारण मंत्री आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे.  शिंदे यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यांच्या विधानावर   शेतकऱ्यांमधून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. 

पाथर्डी येथे  पालकमंत्री राम शिंदे यांची शेतकऱ्यांनी भेट घेऊन  दुष्काळी स्थितीमुळे चारा उपलब्ध नसल्याचे सांगितले. जनावरांची चाऱ्या अभावी उपासमार होत असल्याचे  सांगितले. यावर  चारा नसेल तर आपली जनावरे पाहुण्याकडे नेऊन बांधा, असा अजब सल्ला त्यांनी दिला. त्यावेळी उपस्थित असलेल्या काही स्थानिक नेत्यांनी आणि नगरसेवकांनी हसून प्रतिसाद दिला.

दरम्यान, अशी उत्तरे देणाऱ्यांना मंत्री म्हणावे की नाही, असा  प्रश्न पडतो. आमचे पाहुणे जम्मू-काश्मीर किंवा तामिळनाडूला राहत नाहीत. तेही या दुष्काळी भागातच राहतात. शिंदे यांची  स्वत:ची जबाबदारी ढकलण्याची ही भाषा आहे. यावर जास्त न बोललेले बरे आहे,  अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी  देऊन शिंदेंच्या विधानाचा निषेध  केला आहे.