Maharashtra

चारा छावणीच्या मागणीसाठी शेतकऱ्याची आत्महत्या, चौकशीची विखे पाटीलांची ग्वाही

By PCB Author

August 03, 2019

नगर, दि. ३ (पीसीबी) –  छावणीच्या मागणीसाठी शेतकऱ्याने आत्महत्या केल्याप्रकरणी प्रशासनाचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. अधिकाऱ्यांकडून विसंगत उत्तरे येत आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाईसाठी आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिली.

घोसपुरी (ता. नगर) येथील शेतकरी वसंत सदाशिव झरेकर (वय ४९) यांनी जनावरांच्या चारा छावणीच्या मागणीसाठी आज पहाटे विषारी औषध प्राशान करून आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आला. शिवसेनेच्या नेते संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी शवविच्छेदनगृहाजवळ ठिय्या आंदोलन करीत संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. शासकीय रुग्णालयात विखे पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांनी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच या प्रकरणाची तहसीलदारांना बोलावून प्राथमिक चौकशी केली. चौकशीतील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

या वेळी पत्रकारांशी बोलताना विखे पाटील म्हणाले, ”या प्रकरणात प्रशासनाचा निष्काळजीपणा झाला, ही वस्तुस्थिती आहे. एव्हढी मोठी घटना घडूनही जिल्हाधिकारी, तहसीलदार यांनी घटनास्थळी जाण्याची आवश्यकता होती, मात्र कुणीही तेथे गेले नाहीत. उलट त्या शेतकऱ्याला गाया किती, शेळ्या किती अशी चौकशी करून विसंगत उत्तरे दिली जात आहेत. छावण्या बंद झाल्या त्यावेळी शेतकरी उपोषणाला बसले होते. त्यांच्या न्याय मागण्यांसाठी शेतकरी जातो, तेथे गुन्हे दाखल होतात, त्यांना अटक होते, ही बाब भूषणावह नाही. अधिकाऱ्यांनी संयमाने परिस्थिती हाताळण्याची गरज होती, तसे मात्र झाली नाही. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर दिरंगाई झालेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईची विनंती करणार आहोत. ”

पाटील पुढे म्हणाले की, ”ज्या भागात पाऊस नाही, त्या भागात आजही छावण्या सुरू आहेत. चांगला पाऊस पडेपर्यंत छावण्या सुरू ठेवण्याचे स्पष्ट आदेश सरकारचे आहेत. परंतु त्यामध्ये काही अधिकाऱ्यांकडून शासनाच्या निर्णयाची अवहेलना होत असेल, शेतकऱ्यांना त्रास देण्याची भावना असेल, तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांना भेटून भरीव मदत मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे.