Pune

चायनीज सेंटरवर टाकला सामाजिक सुरक्षा विभागाने छापा…आणि सापडला लाखोंचा दारू साठा

By PCB Author

December 20, 2020

हिंजवडी, दि. २० (पीसीबी) – अवैधरित्या हॉटेलमध्ये दारू विक्री करणा-या दोन हॉटेलवर पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. त्यात पोलिसांनी एक लाख २७ हजार ९०६ रुपये किमतीचा दारूसाठा जप्त केला. ही करावी शुक्रवारी (दि. १८) रात्री सव्वानऊ वाजता हिंजवडी फेज तीन येथील स्वरा चायनीज अँड तंदूर पॉईंट आणि खुशबू कबाब करी अँड बिर्याणी रेस्टो येथे करण्यात आली.

योगेश राघू वाडेकर (वय ३२), सुमित नागेश वाडेकर (वय २१), गणेश प्रभाकर गाणीग (वय ३२) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी त्यांच्या हॉटेलमध्ये बेकायदेशीररीत्या देशी व विदेशी दारूच्या बाटल्या विक्रीसाठी ठेवल्या होत्या. हॉटेलमधील लोकांना एकत्र करून कोरोना साथीचा प्रादुर्भाव पसरविण्याचे कृत्य त्यांनी केले.

तसेच दारू विक्रीचा कोणताही शासकीय परवाना नसताना त्यांनी दारू विक्री केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी दोन्ही हॉटेलमधून एक लाख २७ हजार ९०६ रुपये किमतीचा देशी, विदेशी दारू व बिअर बाटल्या असा दारूसाठा जप्त केला. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.