चायनीज गाड्यांवर कुजलेले, रोगट; मृत झालेल्या कोंबड्यांचे मांस 

0
997

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – रस्त्यांवरील चायनीज खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर ताव मारताना अनेक मुंबईकर दिसतात. स्वस्तात मिळणाऱ्या या चायनीजमध्ये रोगट, आधीच मृत झालेल्या कोंबड्यांचे मांस वापरले जाते याची पुरेशी कल्पनाही खवय्यांना नसते. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने केलेल्या कारवाईत हेच धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शिवडीत घातलेल्या छाप्यात कुजलेले २५ किलो चिकन जप्त केले. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

मुंबईबाहेरून रोज लाखो कोंबड्या शहरात येतात. पण प्रवासात रोगट कोंबड्यांचा मृत्यू होतो. या मेलेल्या कोंबड्या कचऱ्यात टाकल्या जातात. याच कोंबड्या विकत घेऊन त्यातील मांस स्वस्त दरात चायनीज गाड्यांवर विकले जाते. या संदर्भातील तक्रार एफडीएकडे आल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त (अन्न) शैलेश आढाव यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले. शिवडीतील एका झोपडीत विनापरवाना कोंबड्या कापल्या जात होत्या. त्या सर्व आधीच मेलेल्या कोंबड्या होत्या. दरम्यान, एफडीए आरोपींवर न्यायालयात खटला दाखल करणार आहे.