Maharashtra

“चाकरमण्यांनी गणेशोत्सवाला कोकणात जाऊ नये” – कालनिर्णयकार जयराज साळगावकर

By PCB Author

July 28, 2020

मुंबई, दि. २८ (पीसीबी) : “यंदाच्या गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांनी कोकणात जाऊ नये. ‘भय इथले संपत नाही’, अशी परिस्थिती सगळीकडे आहे. कोकणात जाऊन त्या भयात भर घालण्यात काहीच अर्थ नाही. गणेशोत्सवाला कोकणात जाऊन जीवावर बेतणारी भक्ती कोकणवासियांनी करु नये,” असं आवाहन कालनिर्णयकार जयराज साळगांवकर यांनी केलं आहे. “दुसऱ्याला धीर देण्याचं काम हे ज्योतिषी आणि पंचांग करत असते. पण काही ज्योतिषी घाबरवून टाकतात हे चुकीचं आहे. त्यामुळे कोरोना हा ज्योतिषाला आणि पंचांगाला कळलेला नव्हता. पंचांग हे गणितावर अवलंबून आहे. पंचांग आणि भविष्य यांचा थेट संबंध येत नाही. त्यामुळे कोरोना हा पंचांगाला कळलेला नाही. शेकडो वर्षांपूर्वी ज्यांनी हे पंचांग मांडलं त्यांच्याही डोक्यात नसेल की असं काही भविष्यात होईल,” असं मत जयराज साळगांवकर यांनी व्यक्त केलं आहे.

जयराज साळगांवकर पुढे म्हणाले की, “जवळजवळ वीस वर्ष मी माझ्या वडिलांसोबत मालवणला गणेश उत्सव साजरा करण्यासाठी जात होतो. कोकणातला गणेशोत्सव किती महत्त्वाचा आहे, हे मी पाहिलेलं आहे. या सर्व गोष्टी चुकवणे हे किती कठीण आहे याची मला पूर्णपणे कल्पना आहे. कोकणवासियांसाठी वर्षातील एकमेव सर्वात महत्त्वाचा गणेशोत्सव सण आहे. सध्याची परिस्थिती खूपच कठीण आहे. या उत्सवातून जो आनंद मिळणार आहे, त्यापासून आपण वंचित राहणार ही भावना दुःखदायक आहे. यंदा गणेशोत्सवाला कोकणात जाणं म्हणजे अनेक समस्यांना तोंड देण्यासारखं आहे. एसटी बसेस मिळण्यापासून गावात प्रवेशापर्यंत अनेक बंधने आणि अडचणी कोकणवासियांसाठी येणार आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाचा खरा आनंद या सर्वांमध्ये गुरफटून जाणार आहे, तो कोकणवासियांना घेता येणार नाही.

“कोकणी माणूस हा भिडस्त आहे तो तुम्हाला नाही सांगणार, की तुम्ही येऊ नका म्हणून, ते म्हणणार, ‘तुम्ही येवा, मग मी बघतलो’, असंच ते म्हणणार परंतु ते खरं नाही. तिथे गेल्यावर काय होईल, ‘कोरोना घेऊन इले’ अशी भावना होईल. आणि ती भावना त्रासदायक होईल, कधी कधी काही गोष्टी टाकलेल्या पाहिजेत. ‘भय इथले संपत नाही’ अशी परिस्थिती सगळीकडे आहे. कोकणात जाऊन त्या भयात भर घालण्यात काहीच अर्थ नाही. अशा परिस्थितीत कोकणात जाणं म्हणजे शासन व्यवस्थेवर तणाव निर्माण होणार आहे. या गणेशोत्सवाला कोकणात न गेल्याने शासनावरचा ताण कमी होईल, महाराष्ट्रावरची, मोरयावरची भक्ती होईल, संस्कृतीची भक्ती होईल,” असं साळगावकारांनी सांगितलं.

“आमच्या वडिलांनी 30 वर्षांपूर्वी मालवणचा गणपती मुंबईत आणला त्यानंतर आमची भरभराट झालेली आहे. देव काही कोपत नाही, देव तुमच्या अंतरी असतो. जीवावर बेतणारी भक्ती कोकणवासियांनी करु नये. तज्ञांच्या मते कोरोनाची परिस्थिती सुधारण्यासाठी पुढील दहा वर्षे लागतील, मानव हा एकच प्राणी आहे, जो कुठल्याही संकटावर मात करुन परत उभारु शकतो. त्यामुळे हे संकट दूर होईल,” असंही साळगावकर म्हणाले.

ज्योतिषी आणि पंचांगाला कोरोना कळलेला नाही “पंचांग हे गणितावर अवलंबून आहे. त्यामुळे पंचांग आणि भविष्य यांचा थेट संबंध कुठेही येत नाही. त्यामुळे कोरोना हा पंचांगाला कळलेला नाही. शेकडो वर्षांपूर्वी ज्यांनी हे पंचांग मांडलं त्यांच्याही डोक्यात नसेल ही असं काही भविष्यात होईल म्हणून. वाराणसीच्या एका पंचांगकर्त्याने यासंदर्भात लिहिलं असल्याची चर्चा झाली. त्याची आम्ही सखोल चौकशी केली. मात्र तसं कुठेच निदर्शनात आलेलं नाही. हे सगळे खोटे आहेत. अनेक गोष्टी मानवी बुद्धीच्या पलीकडे असतात. दुसऱ्याला धीर देण्याचा काम हे ज्योतिषी आणि पंचांग करत असते. पण काही ज्योतिषी घाबरवून टाकतात, हे अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे कोरोना हा ज्योतिषाला आणि पंचांगाला कळलेला नव्हता. पंचांग हे आकाशाचा विचार करते पृथ्वीचा नाही,” असंही जयराज साळगांवकर यांनी सांगितले आहे.