चाकण हिंसाचार प्रकरणी १५ आरोपींना सहा दिवसांची पोलिस कोठडी

0
695

चाकण, दि. २ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चाकण येथे सोमवारी (दि.३० जुलै) झालेल्या हिंसाचारात सहभागी असलेल्या १५ आरोपींना पोलिसांनी  बेड्या ठोकून आज (गुरुवार) खेड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधीकारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना ८ ऑगस्ट पर्यंत सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.  

सूर्यकांत बाळू भोसले (वय २१), परमेश्वर राजेभाऊ शिंदे (वय २२), अभिषेक विनोद शाह (वय १९), विशाल रमेश राक्षे (वय २६), सत्यम दत्तात्रय कड (वय १९), मनोज दौलत गिरी (वय २३), समीर विलास कड (वय २०), रोहिदास काळूराम धनवटे (वय १९), विकास अंकुश नाईकवाडी (वय २८), सोहेल रफिक इनामदार (वय १९), प्रवीण उध्दव गावडे (वय २३), आकाश मारुती कड (वय २५), सचिन दिगंबर आमटे (वय २७), आनंद दिनेश मांदळे (वय १८), प्रसाद राजाराम खंडेभराड (वय १८ सर्व रा. चाकण आणि परिसर) असे पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या १५ आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी बुधवारी (दि.१) रात्री पासून अटकसत्र सुरू केले. त्यामध्ये १८ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यामधील तिघेजण अल्पवयीन आहेत. यामुळे १५ जणांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. १०० हून अधिक आंदोलकांची ओळख सीसीटीव्ही फुटेजवरून पटली असून त्यांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये चाकण येथे कामासाठी आलेले, झोपडपट्टी आणि आसपासच्या ग्रामीण भागातील व्यक्तींचा समावेश आहे. आरोपींवर दंगल घडवणे, जमाव जमवणे, पोलिसांवर हल्ला करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.