चाकण येथे बेवडे म्हटल्याने दोघांना मारहाण करून सोनसाखळी हिसकावली

0
884

चाकण, दि. १४ (पीसीबी) – जेवणासाठी हॉटेल मध्ये थांबले असताना मित्रांना बेवड्यांनो आवरा असे म्हटले असता समोरच्याला वाटले त्यालाच बेवडे म्हटले. याचा राग मनात धरून चौघाजणांनी मिळून दोघांना मारहाण करत एकाच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरुन नेली. ही घटना चाकण पोलीस ठाणे हद्दीतील सुपे गावात गुरुवारी (दि.१३) रात्रीच्या सुमारास घडली.

किसन तुकाराम शिंदे (वय ५६) आणि गिताराम प्रधान (दोघेही रा. पाईट, खेड) असे मारहाण झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार, अजिंक्य संजय घुले, आदेश सखाराम कावडे आणि त्याच्या एका साथीदाराला अटक केली असून एकजण अद्याप फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्रीच्या सुमारास फिर्यादी शिंदे, प्रधान आणि त्यांचे मित्र स्कॉर्पिओ गाडीतून जात असताना जेवणासाठी एका हॉटेल वर थांबले होते. त्यावेळी शिंदे हे इतरांना उरका बेवड्यानो असे म्हणाले. बेवड्यानो आपणाला म्हटल्याचा गैरसमज बाजूला बसलेले आरोपी अजिंक्य, आदेश आणि त्याच्या साथीदारांना झाला. आरोपींनी पाठलाग करून फिर्यादी यांची गाडी थांबवली. तसेच मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन कापून नेली.  पोलिसांनी अजिंक्य, आदेश आणि त्यांच्या आणखी एका साथीदाराला अटक केली आहे. तर एक आरोपी फरार झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक डुबे तपास करत आहेत.