चाकण येथे एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसांसह तरुणाला अटक

0
762

चाकण, दि. १२ (पीसीबी) – एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसांसह तरुणाला रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने चाकण पोलीस ठाणे हद्दीतील श्रीपती बाबा समाधीजवळ केली.

अतुल तानाजी भोसले (वय २४, रा. म्हाळुंगे इंगळे ता. खेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. त्याच्याविरोधात अवैधरित्या हत्यार बाळगल्या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेकडील पोलीस शिपाई प्रवीण पाटील यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, चाकण येथील श्रीपती बाबा समाधीजवळ एक इसम पिस्तुल विक्री करण्यासाठी येणार आहे. यावर पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून अतुल याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आले. पोलिसांनी ते जप्त करुन आरोपी अतुल याला अटक केली. त्याच्याविरोधात अवैधरित्या हत्यार बाळगल्या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने केली. चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.