चाकण पोलीस ठाण्यात घुसून पोलीस उपनिरीक्षकाला शिवीगाळ करत मारहाण

0
671

चाकण, दि. २४ (पीसीबी) – चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या एका व्यावसायिकाच्या दोन मुलांनी चाकण पोलीस ठाण्यात घुसून गोंधळ घातला. तसेच कर्तव्य बजावत असलेले पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कठोरे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि.२२) रात्री अकराच्या सुमारास चाकण पोलीस ठाण्यात घडली.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद रामकृष्ण कठोरे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कल्लु नागेंद्र डुबे (वय २५) आणि त्याचा भाऊन सोनु नागेंद्र डुबे (वय २१, रा. अजमेरा कॉलनी, पिंपरी) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कल्लु आणि सोनु यांचे वडिल नागेंद्र हे व्यावसायिक आहेत. शुक्रवारी रात्री चौकशी दरम्यान चाकण पोलीसांनी एक टेम्पो ताब्यात घेतला होता. त्यातील सामानाची बील नागेंद्र यांच्याकडे नव्हती. यावर नागेंद्र यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन चाकण पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. ही बाब नागेंद्र यांची मुल कल्लु आणि सोनु या दोघांना कळाली. त्यांनी रात्री अकराच्या सुमारास पोलीस ठाण्यात घुसून धिंगाना घातला. तसेच कर्तव्यावर असलेले पोलीस उपनिरीक्षक प्रमोद यांना, “तुला माहित नाही का मी कोण आहे”, असे म्हणुन प्रमोद यांच्या हातावर फटका मारुन ढकलुन दिले तसेच सोनु याने प्रमोद यांच्या डाव्या पायावर लाथ मारुन शिवीगाळ करत धमकावले आणि सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी सोनु आणि कल्लु या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांची रवाणगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.