चाकण एमआयडीसी येथे कामगारांना लुटण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना घातक हत्यारांसह अटक

0
822

चाकण, दि. २० (पीसीबी) – कामावरुन सुटणाऱ्या कामगारांना लुटण्यासाठी दबा धरुन बसलेल्या दोघा दरोडे खोरांना चाकु, कोयता, मिरचीची पुड आणि कार असा एकूण ५ लाख ५ हजार ७५० रुपयांच्या ऐवजासह अटक करण्यात आली. तर त्यांचे इतर तीन साथीदार फरार झाले. ही कारवाई मंगळवार (दि.१९) रात्री उशीरा पावनेदोनच्या सुमारास चाकण पोलिसांनी मौजे चाकण गावाच्या हद्दीतील आंबेठाण चौक येथे केली.

निखील रतन कांबळे (वय १९, रा. खंडोबा माळ चाकण) आणि ओमकार मनोज बिसनारे (वय १९, रा. चाकण) असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. तर अविनाश गंगाराम भिसे (रा. राणुबाई मळा, खेड), रामदास सुखदेव घोडके (रा. तोरपे यांची खोली, आंबेडकरनगर चाकण) आणि महेश शिंदे (रा. रासे, खेड) हे तिघे फरार झाले आहेत. या सर्वाविरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री पावनेदोनच्या सुमारास चाकण पोलिस चाकण गावाच्या हद्दीतील आंबेठाण चौक येथे गस्त घातल होते. यावेळी त्यांना (एमएच/१२/एलपी/५२२०) या क्रमांकाची स्वीफ्ट कार आढळून आली. पोलिसांनी त्यावर संशय आला त्यांनी कारजवळ धाव घेतली असता त्यातील तिघा आरोपी अविनाश, रामदास आणि महेश यांनी तेथून पळ काढला. तर निखील आणि ओमकार या दोघांचा पाठलाग करुन पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांची अगझडती घेतली असता त्यांच्याकडे चाकु, कोयता, मिरचीची पुड आढळून आली. पोलिसांनी कार आणि इतर साहित्य असा एकूण ५ लाख ५ हजार ७५० रुपयांच्या ऐवजासह या दरोडेखोरांकडून जप्त केला आहे. त्यांची कसून चौकशी केली असता चाकण एमआयडीसी येथून कामावरुन सुटणाऱ्या कामगारांना ते लुटत असल्याचे कबुल केले. पोलीस उपनिरीक्षक कोकाटे तपास करत आहेत.