चाकणमध्ये २० हजारांच्या हफ्त्यासाठी स्वीट्सचे दुकान फोडून मालकाला जीवे ठार मारण्याची धमकी

0
1634

चाकण, दि. ४ (पीसीबी) – वीस हजारांचा हाफता दिला नाही म्हणून दहा जणांच्या टोळक्यांनी स्वीट्सच्या दुकानाची तोडफोड करुन मालकाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. ही घटना शनिवार (दि.१) सायंकाळी सातच्या सुमारास चाकण येथील भांबोली गावातील भवानी स्वीट्स या दुकानात घडली.

याप्रकरणी दुकान मालक पुनाराम कासाराम चौधरी (वय ५०, रा. सावरदरी, कनीफनाथ कदम यांच्या खोलीत, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यानुसार बाबु शिवाजी वाडेकर (रा. भांबोली) आणि त्यांच्या ८ ते १० साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पुनाराम चौधरी यांचे चाकण येथील भांबोली गावात  भवानी स्वीट्स नावाचे मिठाईचे दुकान आहे. याच परिसरात आरोपी बाबु वाडेकर आणि त्याचे साथीदार राहतात. शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास आरोपी बाबु हा त्याच्या ८ ते १० साथीदारांना घेऊन पुनाराम चौधरी यांच्या भवानी स्वीट्सच्या दुकानात गेला. त्याने पुनाराम यांचा मुलगा अशोक याला दुकान चालवायचे असेल तर महिन्याला २० हजार रुपयांचा हफ्ता द्यावा लागेल अशी धमकी दिली. यावर फिर्यादी पुनाराम आणि त्यांच्या मुलगा अशोक यांनी आरोपींना हाफता देण्यास नकार दिला. यामुळे बाबु आणि त्यांच्या ८ ते १० साथीदारांनी मिळून दुकानातील काचाचे फर्निचर, फ्रिज, एलसीडी टीव्ही, सीसीटीव्ही कॅमेरे आणि विक्रिस ठेवलेले पदार्थाचे नुकसान करुन जीवेठार मारण्याची धमकी दिली. आरोपी अद्याप फरार आहेत. चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संजय घाडगे तपास करत आहेत.