चाकणमध्ये मायलेकीला घरात घुसून मारहाण; सात जणांना अटक

2136

चाकण, दि. १४ (पीसीबी) – जोराने दरवाजा उघडल्याचा जाब विचारला म्हणून सात जणांनी मिळून एका १८ वर्षीय तरुणीसह तिच्या आईला घरात घुसून जबर मारहाण केली. ही घटना सोमवार (दि.१२) रात्री साडेनऊच्या सुमारास चाकण आडगाव येथील घरात, गावातील विठ्ठल मंदीरासमोर आणि मोकळ्या मैदानात घडली.

याप्रकरणी १८ वर्षीय तरुणीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विठ्ठल गोविंद शिंदे (वय ६५), विष्णु गोविंद शिंदे (वय ५५), तुकाराम विठ्ठल शिंदे (वय ३६), रामदास विठ्ठल शिंदे (वय २३), निवृत्ती ज्ञानदेव शिंदे (वय २५), महेश विष्णु शिंदे (वय २२) आणि महादु किसन पाणमंद (वय ३५, सर्व रा. औंढा, पोस्ट आंबोली, ता. खेड) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी हे नातेवाईक आहेत. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तरुणी आणि तिची आई घरात असताना महादु पाणमंद हे दारु पिऊन फिर्यादी यांच्या घरी गेले तसेच जोराने दरवाजा उघडला. जोराने दरवाजा उघडल्याचा जाब फिर्यादी तरुणीच्या आईने आरोपी पाणमंद यांना विचारला. मात्र पाणमंद याने वरील इतर आरोपींना बोलवून तरुणीच्या घरात घुसून तरुणीसह तिच्या आईला जबर मारहाण केली. याप्रकरणी आरोपींवर चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार जाधव तपास करत आहेत.