चाकणमध्ये मराठा आंदोलकांकडून एसटी आणि पीएमपी बसची तोडफोड करुन जाळपोळ

0
536

चाकण, दि. ३० (पीसीबी) – मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आज (सोमवार) आळंदी, खेड आणि चाकण येथे बंदचे आवाहन करण्यात आले असून येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदमुळे शहरपरिसरातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. दरम्यान, चाकण येथे काही आंदोलकांनी हिंसक होत ३ एसटी आणि १ पीएमपी बसवर दगडफेक करीत ती जाळण्याचा प्रयत्न केला.

मिळालेल्या माहितीनुसार, आज (सोमवार) आळंदी, खेड आणि चाकण परिसरात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र दुपारच्या सुमारास चाकण येथे काही आंदोलकांनी ३ एसटी आणि १ पीएमपी बसवर दगडफेक करुन जाळपोळ केली. तर राजगुरूनगर-खेड येथे पुणे-नाशिक महामार्गवर टायर जाळून रस्ता रोखण्यात आला होता. आंदोलकांनी येथे १ तास ठिय्या आंदोलन केले. आजवर शहरी भागात झालेल्या मराठा आंदोलनांनंतर आता पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही हे आंदोलनाचे लोण पोहोचले आहे.