चाकणमध्ये भंगाराचा माल घेऊन जाणारा टेम्पो अडवून खंडणीची मागणी

0
536

चाकण, दि. १ (पीसीबी) – भंगाराचा माल घेऊन जाणारा टेम्पो अडवून वीस हजार रुपयांची खंडणी मागीतल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी (दि.२९) दुपारी दोनच्या सुमारास चाकण औद्योगिक वसाहतीतील महाळुंगे इंगळे येथे घडली.

याप्रकरणी जीशान मेहमूद अली (वय २५, सध्या रा. कुदळवाडी, मूळ रा. कानपूर, उत्तर प्रदेश) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यानुसार अक्षय नामदेव काचळे (रा. महाळुंगे, ता. खेड) आणि आल्हाट (पूर्ण नाव पत्ता कळुशकलेले नाही) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.२९) दुपारी दोनच्या सुमारास चाकण औद्योगिक वसाहतीतील महाळुंगे इंगळे हद्दीतील बजाज कंपनीमधून भंगाराचा माल घेऊन फिर्यादी जीशान अली हा आयशर टेम्पो (क्र.एमएच/१४/सीटी/३९४२) घेऊन टेम्पो चालक सेसमंत चौधरी याच्या समवेत जात होता. या दरम्यान टेम्पो बजाज कंपनी रोडवरून निघोजे रोडने कुदळवाडी येथे निघाला असता ठाकरवाडीजवळ एका दुचाकीस्वाराने (दुचाकी क्र.एमएच/१४/सीझेड/६३८२) याने दुचाकी टेम्पोला आडवी घालून टेम्पो थांबवला. तसेच फिर्यादी जीशान यांना येथील कंपन्यांकडून लाकडी भंगार खरेदी करण्याचे ठेके आम्ही घेतो. तुम्ही माझ्यापेक्षा जास्त पैशांनी लाकडी बॅलेट खरेदी करता. त्यामुळे मला आता वीस हजार रुपये दिले तरच मी तुमचा टेम्पो पुढे जाऊ देईन अशी धमकी दिली.

काही वेळाने त्या ठिकाणी एका कारमधून आलेल्या आल्हाट नामक इसमाने सुद्धा टेम्पोच्या समोर आपली कार उभी केली. त्यानंतर टेम्पोच्या चालकाने पैसे नाहीत. जाऊ द्या, अशी विनवणी केली. मात्र संबंधित इसमांनी दमदाटी सुरुच ठेवली. अखेरीस टेम्पो चालक आणि फिर्यादी यांनी टेम्पोचे मालक सौरभ अली यांना सदरच्या घटनेची माहिती दिली. सौरभ अली यांनी चाकण पोलीस ठाण्यात फोन करून सदरचा प्रकार सांगितला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आरोपी अक्षय नामदेव काचोळे यास ताब्यात घेतले. तर कारचालक आल्हाट कारसह फरार झाला. चाकण पोलिस अधिक तपास करत आहेत.