चाकणमध्ये बाटलीत पेट्रोल न दिल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण

0
2376

चाकण, दि. १७ (पीसीबी) – बाटलीत पेट्रोल न दिल्याच्या कारणावरुन दोघा जणांनी मिळून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण करुन जखमी केली. ही घटना शनिवारी (दि.१५) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चाकण पोलीस ठाणे हद्दीतील काळुस येथील पोटवडे यांच्या पेट्रोल पंपावर घडली.

अंगद झोखु कुशावह (वय ३३, रा. काळुस) असे मारहाणीत जखमी झालेल्या पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अक्षय बुरुड आणि विनोद सोनारी (दोघेही. रा. भोसे. ता.खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण पोलीस ठाणे हद्दीतील काळुस येथील पोटवडे यांच्या पेट्रोल पंपावर जखमी अंगद कुशावह हे गाड्यांमध्ये पेट्रोल भरण्याचे काम करतात. शनिवारी ते पेट्रोल भरण्याचे काम करत असताना आरोपी अक्षय आणि विनोद हे दोघे तेथे आले. त्यांनी अंगदला बाटलीत पेट्रोल देण्यास सांगितले. मात्र बाटलीत पेट्रोल देता येत नाही असे म्हणून पेट्रोल देण्यात अंगतने नकार दिला. यावर अंगद आणि आरोपींमध्ये बाचाबाची झाली. यावर आरोपींनी अंगद यांना लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण करत जखमी केले आणि पसार झाले. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.