Bhosari

चाकणमध्ये पूर्ववैमनस्यातून टोळक्यांनी तरुणाच्या डोक्यात बाटली फोडून चाकूने केले वार

By PCB Author

September 29, 2018

चाकण, दि. २९ (पीसीबी) – पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन चौघा जणांनी मिळून एका तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून चाकूने प्राणघातक वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवार (दि.२८) रात्री अकराच्या सुमारास चाकण येथील नाणेकरवाडी गावाच्या हद्दीत असलेल्या युनिकेअर हॉस्पीटलसमोर घडली.

प्रविण भगवान चव्हाण (वय ३०, रा. माझबाव, भैरवनाथ मंदिराशेजारी, ता.खेड, जि.पुणे) असे चाकूचे वार होऊन गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अक्षय ठोसर, सुरेश ठोसर आणि दोन अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास प्रविण हे चाकण येथील नाणेकरवाडी गावाच्या हद्दीत असलेल्या युनिकेअर हॉस्पीटलसमोर उभे होतो. यावेळी गुरुवार (दि.२७) झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन आरोपी अक्षय ठोसर, सुरेश ठोसर आणि त्याच्या दोन अनोळखी साथीदारांनी मिळून प्रविण याच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली तसेच चाकूने वार पाठीवर वार करुन लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. या घटनेमध्ये प्रविण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर आरोपी अक्षय ठोसर, सुरेश ठोसर आणि दोन अज्ञात इसमांविरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.