Bhosari

चाकणमध्ये दोघा भावांना आठ जणांच्या टोळीकडून जबर मारहाण

By PCB Author

December 09, 2018

चाकण, दि. ९ (पीसीबी) – किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणातून आठ जणांच्या टोळीने एका अल्पवयीन तरुण आणि त्याच्या चुलत भावास कोयता, दगड आणि लाकडी दांडक्याने जबर मारहाण करुन गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवारी (दि.७) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास चाकण येथील मौजे कोये येथे घडली.

अमोल ज्ञानेश्वर राळे (वय १७) आणि त्याचा चुलत भाऊ राहुल राळे असे मारहाणीत जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी त्यांनी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, तेजस राळे, आकाश साहेबराव राळे, शुभम बाळु भुजबळ, सोमनाथ राजेंद्र भुजबळ, अमर सुरेश राळे, निशांत दत्तात्रय महाले, वैभव संतोष बच्चे आणि किशोर राजेंद्र भुजबळ (रा. चाकण, ता. खेड) या आठ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी जखमी अमोल याचे तेजस राळे सोबत किरकोळ कारणावरुन भांडण झाले होते. यामुळे आरोपी आकाश राळे, शुभम भुजबळ, सोमनाथ भुजबळ, अमर राळे, निशांत महाले, वैभव बच्चे आणि किशोर भुजबळ यांनी मिळून अमोल आणि त्याचा चुलत भाऊ राहुल राळे याला शिवीगाळ करत कोयता, दगड आणि लाकडी दांडक्याने जबर मारहाण करुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.