Bhosari

चाकणमध्ये देशी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसांसह तरुणाला अटक

By PCB Author

December 10, 2018

चाकण, दि. १० (पीसीबी) – एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुस असा एकूण २६ हजार ५०० रुपयांचा ऐवज जवळ बाळगल्या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट १ च्या पोलीस पथकाने शनिवारी (दि.८) सायंकाळी साडेसातच्या सुमारास चाकण मेदनकरवाडी येथील कमाणीजवळ केली.

अमर राजकुमार राठोड (वय २२, रा. शिक्षक कॉलनी, मेदनकरवाडी, चाकण) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या विरोधात शस्त्र अधिनियम कलम अनुसार चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी गुन्हे शाखा युनिट १ च्या पोलीस पथकाला माहिती मिळाली कि, चाकण मेदनकरवाडी येथील एका तरुणाकडे पिस्तुल आहे आणि तो मेदनकरवाडी येथील कमाणीजवळ उभा आहे. यावर पोलीसांनी तातडीने त्या ठिकाणी सापळा रचून अमर याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ २६ हजार ५०० रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी ते जप्त करुन आरोपी अमर याला अटक केली. त्याच्या विरोधात शस्त्र अधिनियम कलम अनुसार चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट १ चे पोलीस उपनिरीक्षक के.के.लांडगे तपास करत आहेत.