चाकणमध्ये तरुणीकडे पैशांची मागणी करत लगट करण्याचा प्रयत्न; पोलीस शिपाई निलंबित; दोघा होमगार्ड विरोधात गुन्हा 

0
3305

चाकण, दि. ५ (पीसीबी) – नोकरी निमित्त चाकणला आलेल्या एका तरुणीला तिच्या सहकाऱ्याबरोबर दुचाकीवरून जात असताना एका पोलीस शिपायासह दोघा होमगार्डने पकडले. तसेच त्यांच्याकडे दुचाकीच्या कागदपत्रांसह पैशांची मागणी केली. पैसे नसल्याने त्या तिघांनी तरूणीचा मोबाईल क्रमांक घेतला आणि तिला लॉजवर नेऊन तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला.

याप्रकरणी तरुणी आणि तिच्या सहकारी मित्रांनी पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांच्याकडे तक्रार केली. आयुक्तांनी तातडीने कारवाई करत पोलीस शिपाई सागर मांडे याच्यावर निलंबनाची कारवाई केली. तर होमगार्ड सचिन वाघोले आणि अजय भोसले यांच्यासह तिघांवर पैसे उकळण्यासाठी धमकावणे आणि विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

वरिष्ठ पोलीसव निरीक्षक सुनील पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण-सहारा सिटी रस्त्यालगत तरुण आणि तरुणी रस्त्याच्या बाजूला दुचाकी घेऊन थांबले होते. यावेळी पोलीस शिपाई मांडे याच्यासह दोन होमगार्ड तेथे आले. तरुण-तरुणीला दमदाटी करून पैसे मागू लागले. पाच हजार रुपये द्या, मग सोडून देतो, असे म्हणत त्यांनी दोघांचे आधार कार्ड काढून घेतले. होमगार्डने पैसे आणून दे त्यानंतर आधार कार्ड, ओळखपत्र घेऊन जा, अशी तंबी दिली. तसेच तरुणीचा मोबाईल क्रमांक घेतला. त्यात त्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक सेव्ह केले.

दुसऱ्या दिवशी एक होमगार्ड तरुणी राहत असलेल्या पत्त्यावर गेला. तेथे जाऊन मोबाईलवर संपर्क साधला. तू खाली येतेस का, आम्ही वर येऊ, असे धमकावले. तरुणी खाली आल्यानंतर होमगार्डने तिला दुचाकीवरून एका लॉजवर नेले. तेथे तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. होमगार्डने खोलीत जाण्यास सांगितल्यानंतर तरुणीला काही तरी गडबड असल्याचे लक्षात आले. तिने सहकाऱ्याशी संपर्क साधला. त्याला बोलावून घेतले. तो तातडीने काही कार्यकर्त्यांना घेऊन तेथे पोहचला आणि तरुणीची सुटका केली.  त्यानंतर त्यांनी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्तांनी तातडीने पोलीस शिपाई मांडे याला सेवेतून निलंबित करण्याचे आदेश दिले. तसेच दोन होमगार्डसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.