चाकणमध्ये तरुणाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

0
720

चाकण, दि. २२ (पीसीबी) – एका २९ वर्षीय तरुणाने राहत्या घरातील छताच्या लोखंडी बारला कपड्याच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी (दि. २१) दुपारी साडेबाराच्या सुमारास चाकण पोलीस ठाणे हद्दीतील पुणे – नाशिक महामार्गावरील वाकी खुर्द सुंबरेनगर येथे घडली.

तेजस रमेश यादव ( वय २९, रा. सुंबरेनगर, वाकी खुर्द, ता. खेड ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा मित्र मयूर नरेंद्र परदेशी ( वय ३२, रा. परदेशी वस्ती, वाकी खुर्द, ता. खेड,) याने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, चाकण पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक महामार्गावर वाकी खुर्द  येथील सुंबरेनगर मध्ये तेजस याचे राहते घर आहे. सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास तेजस याने राहत्या घराच्या छतावरील लोखंडी बारला पांढऱ्या रंगाच्या नायलॉन कपड्याच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. चाकण पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी दाखल होऊन त्याचा मृतदेह चाकण ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. रुग्णालयात विच्छेदन होताच रात्री उशिरा अंत्यसंस्कारासाठी त्याचा मृतदेह त्याच्या  नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तेजस हा अविवाहित असून, त्याच्या मागे आई, वडील व दोन भाऊ असा परिवार आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजु शकले नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार  अधिक तपास करत आहेत.