चाकणमध्ये जमिनीच्या वादातून दोन कुटूंबात जबर मारहाण

1522

चाकण, दि. १५ (पीसीबी) – जमिनीच्या वादातून दोन कुटूंबामध्ये झालेल्या जबर मारहाणीत दोन्हीकडील एकूण सहाजण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी (दि.१४) सकाळी साडेआठच्या सुमारास चाकण येथील पवारवाडी आनावळे पाईट येथे घडली.

याप्रकरणी दोन्ही पक्षकाराकडील किसन गणपत पवार (वय ५०, रा. पवारवाडी, आनावळे, पाईट), रामदास किसन पवार, दर्शना रामदास पवार, सुनील विठ्ठल पवार, त्यांचा मुलगा आणि सुन असे मारहाणीत जखमी झालेल्या सहाजणांची नावे आहेत. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार, सुनिल विठ्ठल पवार, बबन विठ्ठल पवार, बबन लक्ष्मण पवार, रामदास विठ्ठल पवार, संजना विठ्ठल पवार, वनिता सुभाष पवार (रा. पवारवाडी, आनावळे पाईट) मनिषा तसेच किसन गणपत पवार, रामदास किसन पवार, दर्शना रामदास पवार, राजु किसन शिंदे या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास जमिनीच्या वादातून दोन्ही कुटूंबामध्ये भांडणे झाली तसेच भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी दोन्हीकडील लोकांनी एकमेकांना लाठ्या काठ्यांनी जबर मारहाण करुन जखमी केले. या घटनेमध्ये एकूण सहाजण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.